लखनऊ – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने लखीमपूर खिरीच्या तिकुनियात तीन ऑक्टोबर रोजी चार शेतकऱ्यांना वाहनाने चिरडल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आशिष मिश्राला जामीन दिला. आशिष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आहे. न्यायमूर्ती राजीव सिंह यांच्या पीठाने १८ जानेवारीला आशिषच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण केली होती. गुरुवारी त्यावर निकाल देण्यात आला. आशिष ९ ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे.
लखीमपूर प्रकरणात स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निगराणी समिती स्थापन केली होती. या समितीच्या निगराणीत एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते. तपास पथकाने आशिषला परवाना असलेल्या शस्त्राचा दुरुपयोग केल्याप्रकरणी आरोपी बनवले होते. तसेच घटनेच्या वेळी आशिष घटनास्थळी हजर होता, असेही म्हटले होते. परवाना असलेल्या शस्त्रातून गोळी झाडल्याचा फॉरेन्सिक अहवालही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आशिषसह १४ इतर आरोपी आहेत. त्यांच्यावर चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यूच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे, आशिषच्या वाहनाचा चालक हरिओम याला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १२ जण अटकेत आहेत. दरम्यान, आशिष मिश्राला जामीन मिळाल्यानंतर सपा आणि काँग्रेसने राज्य व केंद्र सरकारवर टीका केली आहे.