पुणे – वयाच्या तेराव्या वर्षी ती आमची वडील झाली, म्हणून तिला शिकता आले नाही. तिने मला लहान बाहुलीसारखे सांभाळले. लतादीदींची बुद्धी खूप कुशाग्र होती. शिकली असती, तर माझी दीदी पंतप्रधान झाली असती, असे भावोद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी काढले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सारसबागेजवळील भव्य गणेश कला क्रीडा मंचात ही सभा झाली. फक्त निमंत्रितांसाठी ही सभा होती. यावेळी बोलताना आशा भोसले म्हणाल्या, ‘तुमच्या सर्वांसाठी लता मंगेशकर गेल्या, पण आमच्यासाठी आमचे वडील गेले, आमचे सर्वस्व गेले. माझे वडील गेल्यावर तेरा वर्षांची दीदी आमचे वडील झाली. तिने मला तर बाहुलीसारखे सांभाळले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, लतादीदी इतक्या साध्या होत्या की त्या इतक्या मोठ्या आहेत, आपण त्यांच्याशी काय बोलावे, असा संकोच कधी कोणालाही झाला नाही. मला गाण्यातले काही कळत नाही. म्हणून मी त्या जेव्हा नागपूरला आल्या होत्या, तेव्हा आमच्या वर्हाडी मिरचीच्या भाजीविषयी बोललो, पण त्या स्पष्ट म्हणाल्या, ही भाजी मी खाणार नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.
या कार्यक्रमात सुरुवातीला आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, एमआयटी विश्वशांती विद्यापाठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द गायक रूपकुमार राठोड यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांनीही श्रद्धांजली सभेत लतादीदींविषयीच्याआपल्या आठवणी जागवल्या.