रियासी – लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू-काश्मिरच्या रियासी गावात तिथल्या स्थानिकांनी पकडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर, त्या दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले गेले आहे. त्यांच्याजवळ हत्यारे आढळून आली. ती हत्यारेही पोलिसांना देण्यात आली आहेत.
लष्कर-ए-तोयबाचे कमांडर राजौरी जिल्ह्यातले रहिवासी तालिब हुसैन आणि नुकताच झालेल्या आईईडी विस्फोटामागचे मास्टरमाइंड तसेच दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले आतंकवादी फैजल अहमद डर यांचा समावेश आहे. त्यांना रियासीमधल्या तुकसान गावातून पकडण्यात आले. त्यांच्याकडून 2 रायफल, 7 ग्रेनेड आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. गावकर्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी गावकर्यांना 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. नुकतेच दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नौपोरा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले होते. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. सध्या तिथे सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. नौपोरा भागातील मीर बाजार भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलाने आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील केला आणि सुटण्याच्या सर्व मार्गांवर सुरक्षा रक्षक तैनात केले होते.