जोधपूर – भारतीय हवाई दलाला आज अधिक ताकद मिळाली आहे. भारतीय हवाई दलातील लढाऊ कौशल्यांना चालना देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या ‘लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर’ची पहिली तुकडी समाविष्ट करण्यात आली आहे. पहिल्या तुकडीमध्ये भारतीय हवाई दलाला 10 हेलिकॉप्टर मिळाले आहेत. स्वदेशी बनावटीची ‘लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर’ जोधपूर येथे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मधून जोधपूर एअरबेसवर उड्डाण केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत या हलक्या हेलिकॉप्टरचे नाव ‘प्रचंड’ असे देण्यात आले आहे. ताफ्यात सामील झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, एलसीएच शत्रूला चकमा देण्यास, विविध प्रकारचे दारुगोळा घेऊन जाण्यास आणि घटनास्थळी त्वरीत पोहोचण्यास सक्षम आहे. ‘एलसीएच’ विविध भूभागांमध्ये आपल्या सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करतात. आपल्या लष्कर आणि हवाई दलासाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, अॅटॅक हेलिकॉप्टरची दीर्घकाळ गरज होती. 1999 च्या कारगिल युद्धात त्याची गरज गंभीरपणे जाणवली होती. दोन दशकांच्या संशोधन आणि विकासाचे परिणाम आहे.