संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लातूरमध्ये कार व एसटीची धडक! देवदर्शनासाठी गेलेले 5 जण ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लातूर : उदगीर लातूर रस्त्यावरील हैबतपुर पाटी नजीक तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. तर 1 जण गंभीररीत्या जखमी आहे. कार आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला तर एसटी बसचे ही प्रचंड नुकसान झाले. एसटीमधील प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत,अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर येथील चामवाड हॉस्पीटल जवळून मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास 6 जण कारने तुळजापूर दर्शनाला गेले होते. कार चालकाने रस्त्यावर झोपलेले कुत्रे पाहून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी चालकाने कार उजवीकडे वळवली आणि समोरुन येणाऱ्या एसटीला जोरदार धडक बसली.हैबतपूर पाटी जवळ ही घटना घडली.हा अपघात इतका भीषण होता की,यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला . तर एक जखमी झाला आहे.याशिवाय समोरील एसटीमधील दहाजण जखमी झाले आहेत.या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीचा पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.तर जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातानंतर काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला केली. तर एसटीची समोरची काचही तुटली होती. तसेच ड्रायव्हरच्या बाजूच्या चाकालाही फटका बसला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी या अपघातांची नोंद करुन घेतली आहे. दरम्यान या अपघातात अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर,उदगीर) , अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोळा), कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरणाळी ता. मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) , नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ, उदगीर) या गंभीर जखमी झाल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami