लातूर – दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.
दरम्यान,या पावासामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पीक पुरते गेले असून अनेक ठिकाणच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.
मागील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्हाभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील अपचुंदा, तपसेचिंचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस झाला आहे. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली आहे.दरम्यान, या मुसळधार पावासामुळे शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या भागातील ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यावर असणारे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.
आपचुंदा,तपसे चिंचोली, लामजना, मंगरुळ, शेडोळ आणि लामजना या भागातील शिवारात असणारे सोयाबीन पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.येथील अनेक शिवारात पाणीच पाणी झाले आहे.पाण्यात बुडाल्यामुळे सोयाबीनचे पीकही हाताचे गेले आहे. काही भागात जमीनी खरवडून गेल्या आहेत.त्यामुळे पीकही गेले आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.