नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना सीबीआय न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लालूप्रसाद यादव यांना पासपोर्ट देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. मात्र आता किडनीच्या उपचारासाठी सिंगापूरला जायचे असल्याने लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अपील केले होते.
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले आरजेडीप्रमुख लालू प्रसाद यादव यांना पासपोर्ट देण्याचे आदेश रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर लालूप्रसाद यांना त्यांच्या पासपोर्टचे नुतनीकरण करून उपचारासाठी सिंगापूरला जाता येणार आहे. लालू प्रसाद यांचे वकील प्रभात कुमार यांनी सांगितले की, लालू प्रसाद यादव यांच्या पासपोर्टची वैधता संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे त्याचे नुतनीकरण करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत लालूप्रसाद यांच्या पासपोर्टची नुतनीकरण करून घेण्यामागे त्यांना उपचारासाठी सिंगापूरला पाठवण्याचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांची किडनी निकामी झाली असून सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करावे लागणार आहे. यासाठी तेथील रुग्णालयात अपॉइंटमेंट घ्यावी लागते, परंतु अपॉइंटमेंटसाठी अद्ययावत पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.
चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणांमध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली आहे, परंतु शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला. जामिनावेळी सीबीआय न्यायालयात पासपोर्ट जमा करणे आणि मोबाईल नंबर न बदलण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य या पतीसोबत सिंगापूरमध्ये राहतात.