नवी दिल्ली – राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 15 जून रोजी सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदासाठी बिहारचे नेते लालूप्रसाद यादव तसेच मुंबईतील एका दाम्पत्याने अर्ज केला आहे. मोहम्मद ए हमीद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या जोडप्याचे नाव आहे.
निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे निवडणूक होत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये उमेदवारांच्या निवडीवरून चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्यांनी उमेदवारी नाकारली. सत्ताधारी पक्षाकडूनही उमेदवार निवडीची चर्चा सुरू आहे. तर भाजपकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आला नसून राजनाथ सिंह विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत आहेत.