लासलगाव: – लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली आहे. त्यामुळे लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपये पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक नुकसान झाले आहे.
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत आहे, तसेच विदेशात निर्यातीला ही अपेक्षित मागणी नसल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शनिवारी 800 वाहनातून 16 हजार 200 क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला जास्तीत जास्त 1380 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 960 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव जरी मिळताना दिसत असेल मात्र सरासरी 600 ते 800 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.
येथील मुख्य बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक होत आहे. मात्र, तुलनेत मागणी घटल्याने कांदा कमी भावात विकावा लागत आहे. देशातून लाल कांद्याची निर्यात सध्या अफगाणिस्तान, आखाती देश व दुबईमार्गे पाकिस्तान येथे होत आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम या देशांत मागणी तुलनेने कमी झाली आहे. देशांतर्गत गुजरातमधील महूवा, भावनगर, गोंडल भागात आवक अधिक आहे. त्यामुळे दर अपेक्षित नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.