सोनीपत – प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टर रॅलीत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक आंदोलनातील मुख्य आरोपी आणि पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. सोनीपत जिल्ह्यातील कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वेवर मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अपघात झाला. त्यात जबर जखमी झालेल्या दीप सिद्धूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पंजाबी अभिनेता दीप सिद्धू स्कार्पिओ गाडीतून मंगळवारी दिल्ली येथून पंजाबला निघाला होता. रात्री ८ च्या सुमारास सिंधु बॉर्डरपासून काही अंतरावर गेल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या त्याच्या स्कार्पियोची ट्रकशी टक्कर होवून अपघात झाला. त्यात दीप सिद्धू जबर जखमी झाला. त्याची होणारी पत्नी रीना रायही या अपघातात जखमी झाली आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दीप सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोनीपतच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. लाल किल्ला आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी ९ फेब्रुवारीला दीप सिद्धूला अटक झाली होती. त्यानंतर १६ एप्रिल २०२० रोजी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.