औरंगाबाद – दिवाळीनंतर मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत.त्यामुळे लाल मिरचीला सोन्याचा भाव आलाय,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण लाल मिरची बाजारात थेट २६ हजार ते १ लाख रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाल मिरची एवढी तेजतर्रार झाली आहे.
नवीन मिरचीचा हंगाम मार्च ते मे हे तीन महिने असतो. मागील हंगामात मिरची उत्पादक महाराष्ट्र,मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक या राज्यांना अतिपावसाचा फटका बसला होता.अति पाऊस झाल्याने ६० ते ७० टक्क्यांनी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले होते. कर्नाटकातील ब्याडगी नावाचे गाव आहे.तेथून ब्याडगी लाल मिरची बाजारात येते.आजघडीला ही मिरची ४७ हजार ते ५१ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याच मिरचीचे भाव ३० हजार ते ३५ हजार रुपये होते.तिखट, झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
त्यामुळेच आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीला जास्त मागणी असते. १८ हजार ते २० हजार रुपये क्विटलने विकणारी ही मिरची सध्या ३१ हजार रुपये ते ३२ हजार रुपये क्विटल दराने मिळत आहे. खान्देशातून येणारी रसगुल्ला मिरची चक्क ९५ हजार रुपये ते एक लाख रुपये क्विटल भावाने विकली जात आहे. ही मिरची एकदम लालभडक असते; पण तिखटपणा कमी असतो.यामुळे तिला रसगुल्ला लाल मिरची म्हणतात.मागील हंगामात ४५ हजार रुपयांपर्यंत क्चिटलला भाव मिळाला होता.महाग असल्याने व्यापाऱ्यांनी ही मिरची खरेदी करणे बंद केले आहे