लासलगाव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 550 रुपयाची घसरण झाली. कांद्याला सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून आठवड्यामध्ये कांद्याला कमाल दर 2625 रुपये भाव होता. आज सोमवारी कमाल 2075 रुपये दर मिळाला असल्याने 550 रुपयांची घसरण झाली आहे.
देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर येथून लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होते. राज्यात नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळी कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार दरावर झाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये कांद्याला प्रतिक्विंटल बाजार दर मिळाला होता.