लासलगाव- अवघ्या 20 दिवसांत कांद्याचे भाव 50 टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत लासलगाव बाजार समितीत आज सकाळी कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार पुकारल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे.
1 नोव्हेंबरला सरासरी प्रति क्विंटल 2551 रुपये असणारा कांद्याचा दर आता सरासरी प्रति क्विंटल 1500 रुपयांवर सुरु होता. मात्र आज सकाळी सर्वसाधारण कांद्याचे 1 हजार रुपये भाव पुकारल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याला 20 रुपये किलो दर मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी याअगोदरच कांद्याला कवडीमोल भाव दिल्याने कांद्याचा लिलाव बंद पाडण्याचा इशारा दिला होता.चाळीत साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत करूनही कवडीमोल दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होणेही मुश्किल झाले.