- कर्मचाऱ्यांचे रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन
नाशिक – चुकीच्या दिशेने आलेल्या इंजिनची धडक (टॉवर) बसून 4 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील कोटमगाव शिवारात आज पहाटे घडली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केले. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत टॉवर इंजिन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.
संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्माराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ, असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईन कोटमगाव शिवारात सोमवारी पहाटे पावणेसहा वाजता अचानक लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन चुकीच्या बाजूने म्हणजेच लासलगाव बाजूने निफाडकडे आले. या मार्गावर पोल नंबर 15 ते 17 दरम्यान ट्रॅक मेंटन करण्याचे काम सुरु असताना 4 कर्मचाऱ्यांना या इंजिनने धडक दिली. यात कर्मचारी जखमी झाले. या चौघांना स्थानिकांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील यांनी तपासणी करुन या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरुन जोरदार आक्रोश केला. घटना समजतात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.