मुंबई :- लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात आला होता. समाजाच्या ७० टक्के मागण्या पूर्ण झाल्याने मोर्चा स्थगित करत आहोत अशी घोषणा लिंगायत समिती समन्वयक अविनश भोसीकर आणि विनय कोरे यांनी केली.
‘आमच्या ७० ते ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो. मात्र काही मागण्या केंद्रातील सरकार संदर्भात आहेत. त्यावर पुढे अभ्यास आणि चर्चा करू, तो राष्ट्रीय निर्णय आहे,’ असे विनय कोरे म्हणाले. विनय कोरे यांनी मान्य करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सविस्तर माहित देताना सांगितले की, बसवेश्वर यांच्या नावाचे विद्यापीठ तयार करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. येणाऱ्या अधिवेशनापूर्वी घोषणा करण्याची आग्रही मागणी केली ती मान्य होईल. महाराष्ट्र विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती,ती राज्यसरकारने मान्य केली. जागा शोधणे सुरू आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचे मान्य करण्यात आले आहे.
याआधी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर २२ महामोर्चे काढण्यात आले होते. गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत या संदर्भात चर्चा केली होती. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण लेखी उत्तर न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यामुळे आज मुंबईत आझाद मैदान येथे हा महामोर्चा काढण्यात आला.