लखनऊ – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड चर्चेत आहे, तो म्हणजे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत छायाचित्रात कैद झालेल्या एका लिंबू रंगाच्या साडीतील अधिकारी महिलेचा फोटो. मात्र आता त्यांच्या या साडीची चर्चा नाहीये, बरं का. तर आता चर्चा आहे ती त्यांच्या नव्या लूकची. त्याचं झालंय असं की, मागील निवडणुकीत लिंबू रंगाच्या साडीत दिसलेल्या रिना द्विवेदी या यंदा वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसल्या. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या रिना यांनी त्यांचा गेटअप बदलला आहे. आता रिना यांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वेस्टर्न कपडे आणि सनग्लासेस लावून आलेल्या रिना द्विवेदी यांनी यावेळी ‘बदल होत राहायला हवेत’, असे सांगितले. त्या लखनऊमध्ये गृहनिर्माण विभागात क्लर्क पदावर कार्यरत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना इलेक्शन ड्युटी होती, तर यावेळी मोहनलालगंजमध्ये मतदानाचे काम देण्यात आले आहे.
मंगळवारी रिना द्विवेदी या काळ्या रंगाचा स्लिवलेस टॉप आणि व्हाईट ट्राऊझरमध्ये ईव्हीएम नेताना दिसल्या. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. उपस्थित असलेल्या अनेकांसह पोलिसांनीदेखील त्यांच्यासोबत सेल्फी काढले. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘मी फॅशन फॉलो करते. मला अपडेट राहायला आवडते. त्यामुळेच मी पोशाखात बदल केला आहे.’