जुन्नर – मानमोडी डोंगरात असलेली पुरातन लेणी पाहण्यासाठी आलेल्या कडूस येथील शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. यातील १० विद्यार्थी व एका शिक्षिकेस नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित २० जणांवर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खेड येथील डायनॅमिक इंग्लिश स्कूलचे ६९ विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आले होते. हडपसरचा किल्ला पाहून झाल्यावर ते मानमोडी किल्ल्यावर लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेण्यात जाताच तेथील आग्या मोहळातील मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांची पळापळ सुरु झाली. मात्र मधमाशांनी तीस मुलामुलींना चावा घेतला. यात ३० जण जखमी झाले असून एका मुलीची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेची माहिती समजताच वनरक्षक रमेश खर्मले माजी नगरसेवक संजय साखला, उद्योजक संजय वारुळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आमदार अतुल बेनके यांनीही तातडीने ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थी विद्यार्थीनींच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांना कळवण्याची व्यवस्था केली.