मुंबई – मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा, वेळापत्रक तपासा आणि मगच बाहेर पडा. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही रेल्वे मार्गावर आज, रविवारी १२ जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदरदरम्यान रात्री जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी १०.५५ वाजल्यापासून दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाऊन मार्गावर वळवल्या जातील. शिवाय घाटकोपर येथून सकाळी १०.४१ वाजल्यापासून दुपारी ३.५२ वाजेपर्यंत धावणाऱ्या अप धीम्या गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येतील.
तसेच हार्बरच्या सीएसएमटी चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. आज सकाळी ११.४० वाजल्यापासून संध्याकाळी ४.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदरदरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता.