मुंबई -गेल्या महिन्यात बेस्ट मधील कंत्राटी कंपनीने वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.त्यावेळी दिलेल्या इशाऱ्यानुसार काल वडाळाबेस्ट बस आगारात सुमारे ४०० कंत्राटी चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले.
यावेळी युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले की, कंत्राटी कायद्यानुसार ,चालक आणि वाहकांना बेस्ट उपक्रमातील किमान एन्ट्री लेव्हल चालक / वाहकांच्या बरोबरीने पगार मिळाला पाहिजे.या नियमाचा विचार केल्यास या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फारच कमी पगार दिला जात आहे.तसेच बेस्टच्या पूर्णवेळ चालक आणि वाहकांना दिल्या जाणाऱ्या मोफत पाससह सर्व सुविधा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात अशी मागणीही शशांक राव यांनी यावेळी केली.तर बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,खासगी एजन्सी ही
त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर भत्ते ठरवत असते.काल झालेल्या या आंदोलनात चार खासगी एजन्सीचे ४०० कर्मचारी सहभागी झाले होते.मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.