मुंबई – रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे,तेव्हढाच हा रुद्राक्ष अनेक रोगांवर आणि आजारांवर अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे.अग्निरुपात असलेला तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही,असे मानले जाते.अशीच दुर्मिळ तीनमुखी रुद्राक्षाची मुंबईतील वरळी सी फेस येथील दोन झाडे पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरली आहेत. वरळी सी फेस येथील आद्य शंकराचार्य उद्यानात २०१७ मध्ये लावण्यात आलेल्या दोन झाडांना फळधारणा झाली असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ५ जुलै २०१७ रोजी या दोन रुद्राक्षाच्या झाडांची लागवड करण्यात आली होती.या झाडांना आता फळधारणा झाली आहे.या झाडांना ३० ते ४० फळे आली असून त्याच्या आतमध्ये तीनमुखी रुद्राक्ष आहेत.या रुद्राक्षाच्या बिया जतन केल्या जाणार असून त्यापासून आणखी नवीन झाडांची लागवड करता येईल का याचा अभ्यास केला जाणार असल्याचे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. ४ हजार चौरस मीटर जागेत असलेल्या या आद्य शंकराचार्य उद्यानात मोफत वाचनालय आणि विद्यार्थ्यांना झाडांचा अभ्यास करता यावा म्हणून मोफत वाचनालय आणि एक स्टेज उभारला आहे. येथे संगीतमय कार्यक्रमही सादर केले जातात. तसेच आबालवृद्ध यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.