मुंबई – वरळी-शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग काल सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून वरळी-शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे.
हा मार्ग बंद करण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून एलफिन्स्टनकडून प्रभादेवी, वरळीकडे येणारी वाहतूक दीपक टॉकीजवरून पुन्हा वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी एलफिन्स्टनवरून प्रभादेवीला येणारा मार्ग बंद करण्यात आला असून नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे. जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असला तरी आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिकेसाठी एक विशेष मार्गिका ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेव्यतिरिक्त हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. लवकरच वरळी-शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाणपुलाचे काम सुरू होत आहे. काम सुरू असताना काही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा लक्षात घेता रुग्णवाहिकेसाठी येथून एक विशेष मार्गिका तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या वतीने देण्यात आली आहे.