युजीन – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. नीरज पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीसाठी पात्रता मर्यादा ८३.५० मीटर ठेवण्यात आली होती. मात्र नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भाला फेकला आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. युजीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजला आता रविवारी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताची १९ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. जर त्याने पदक जिंकले तर तो जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरूष खेळाडू ठरेल. अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत भारताला मागील १९ वर्षांत एकही पदक जिंकता आलेले नाही. पदकांचा हा दुष्काळ नीरज संपवेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज या २००३ साली पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या.
दरम्यान, भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिची ही तिसरी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप असून अंतिम फेरी शनिवारी सकाळी ६.५० वाजता नियोजित आहे.