मुंबई – वर्षा निवास्थानावर बुधवारी दुपारी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे अनुपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे बैठकीला अनुपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण यामध्ये आता आणखी तीन खासदारांची भर पडली आहे. भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित शिवसेनेवर नाराज आहेत की अन्य कोणत्या कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यापैकी बैठकीला १४ खासदार उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारची सत्ता पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.