वसई – वसई विरार महानगरपालिकेनं आदिवासी बांधवाचे वनहक्क दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आता प्रभाग स्तरावर वनहक्क समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वनहक्क जमिनीचा लढा आता यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याने स्थनिक आदिवासीनी आनंद व्यक्त केला आहे.
जंगल भागांमध्ये गेली अनेक वर्षे आदिवासी लोकांचे वास्तव्य आहे. आदिवासी आणि जंगल हे एक अतूट नात आहे. यांच्या कित्येक पिढ्या उपजिवकेसाठी येथे भातशेती, फळझाडं लावून इथेच आपली घरे बांधून राहत आहेत. मात्र हा भाग वनविभागात येत असल्यानं, पालिका आणि वनविभाग त्यांच्या घरांना आणि शेतींना नोटीसा पाठवून कारवाई करत होत्या. त्यामुळे या वनविभागातील जागा नावावर करण्यासाठी आदिवासी बांधवांनी गेली कित्येक वर्ष लढा दिला आहे. यासाठी गाव पतळीवर समित्या स्थापन झाल्या होत्या. मात्र शहरी भागांत वनविभागाचे दावे हातळण्यासाठी समित्या नव्हत्या. त्यामुळे आदिवासी बांधव या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून संघर्ष करत आहेत.
अखेर आदिवासी बांधवांच्या लढ्याला यश आले असून, वसई विरार शहर महानगरपालिकेनं चार प्रभागामध्ये २७ वनहक्क समित्या स्थापन केल्या आहेत. ही समिती आपला अहवाल प्रांत अधिकाऱ्यांना देणार, त्यानंतर प्रांत जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अहवाल पाठवून त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. मात्र त्या जमिनीवर कोणतही अनधिकृत बांधकाम असेल तर ते वनविभाग आणि पालिकेला त्यावर कारवाईचे आदेश देण्यात येणार आहे. तसेच ज्या वनविभागावर चाळी वसल्या असतील, त्या जमिनीही आदिवासी बांधवाच्या नावावर होणार नाही. त्यामुळे केवळ शेतीसाठीच या वनजमिनी आदिवासी बांधवाना मिळणार आहेत. कित्येक पिढ्या कसत असलेली वनजमिनी आपल्या नावावर होणार असल्यानं आदिवासी बांधांनी आनंद व्यक्त केला आहे.