सातारा – ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) येथील राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात आणले होते. यावेळी सातारा पोलिसांनी त्यांनी केलेल्या आंदोलनाची आणि वक्तव्याप्रकरणी पाच तास चौकशी केली. यावेळी सातारा पोलीस ठाण्याच्या अधिक्षकांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ४१ ए कलमान्वये गुन्ह्यातील शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असेल तर तो गुन्हा जामीनपात्र ठरतो. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन्ही गुन्हे जामीनपात्र असून, ते जोपर्यंत आम्हाला चौकशीत सहकार्य करत आहेत, तोपर्यंत त्यांना अटक करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महिला नेत्यांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे,
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातून जोरदार पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी त्यांनी माफी मागितली. मात्र असे असले तरी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे ज्ञानेश्वर पादुका चौकात त्यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सातारा शहर पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर कारवाई करून त्याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा. तर, बंडातात्या यांनी ४८ तासात लेखी खुलासा राज्य महिला आयोगाला द्यावा असे निर्देश दिले आहेत.
गुरुवारी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात साताऱ्यामध्ये व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कोरोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील आहेत. तसेच सर्वांची नावे जगजाहीर आहेत, असा दावाही बंडातात्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
आंदोलनावेळी बोलताना त्यांनी महिला नेत्यांचा उल्लेख करत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या दारु पितात, नाचतात असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार अशी टीकादेखील केली होती.