पुणे : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहन चालकांकडून टोल वसूल करू नये, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र पाटस येथील टोलनाक्यावर वारकाऱ्यांकडून नियमबाह्य टोलवसुल करून महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचा भंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लेखी स्वरुपात पाटस टोलनाका प्रशासनाला शासनाच्या परिपत्रकानुसार कळविले होते की, वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नका. तरीदेखील हुज्जत घालत टोल वसूल करण्यात आला. याशिवाय या टोलनाका अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करून टोलमाफीविषयी आम्हाला काही कळवले नसल्याचे वारकऱ्यांना सांगितले. त्यामुळे वारकऱ्यांना टोल भरावा लागला.याप्रकरणी पाटस टोलनाक्याच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.