नवी मुंबई – ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलण्यावरून ऊठसूट आंदोलन करणाऱ्या माथाडी कामगारांच्या आंदोलनाला वाशी एपीएमसीतील कांदा-बटाटा घाऊक बाजारातील व्यापारी वैतागले आहेत. त्यांनी आता माथाडी कामगारांच्या आंदोलनांविरोधात सोमवारी २१ फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाशी एपीएमसीत माथाडी विरुद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी असलेले ट्रक माथाडी कामगारांनी कांदा-बटाटा मार्केटच्या गेटवर आडवले. हे ट्रक खाली करण्यास त्यांनी नकार दिला. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी आम्ही उचलणार नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केले. अनेक महिन्यांपासून सतत हा वाद होत आहे. सध्या ओला कांदा आणि बटाटा बाजारात येत आहे. त्यामुळे २५ किलोच्या गोणीत भरलेल्या या मालाचे वजनही ५० किलो होते. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन माथाडींनी आंदोलन करू नये, असे आवाहन एपीएमसी मार्केटमधील व्यापारी करत आहेत. मात्र माथाडी कामगार त्यांना जुमानत नाहीत. या सर्व प्रकारामुळे व्यापारीही वैतागले आहेत. त्यांनी आंदोलन करणाऱ्या माथाडी कामगारांच्या विरोधात सोमवारी २१ फेब्रुवारीला संप पुकारला आहे. त्याचा परिणाम एपीएमसीच्या व्यवहारावर होण्याची शक्यता आहे.