पुणे- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.तसेच गोखले यांच्या पत्नी आणि मुलीनेही ते अत्यवस्थ असल्याचे म्हटले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले की,डॉक्टर्स आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबीयांमध्ये आज सकाळी १० वाजता चर्चा झाली. गोखले हे गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत.त्यांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.ते कोमामध्ये असल्याची आणि उपचाराला साथ देत नसल्याची बातमी तसेच त्यांच्या निधनाचे वृत्त ही अफवा असून ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.उद्या त्यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन जाहिर केले जाईल.तर गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले म्हणाल्या की,गोखले हे गेल्या २४ तासांपासून अत्यवस्थ आहेत.डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.त्यांचे अवयव निकामी झाले असल्याने आत्ताच काही सांगता येणार नाही.तर गोखले यांच्या मुलीनेसुद्धा आपल्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान,विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल कुणीही अफवा पसरवू नये, त्यांच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून काही माध्यमांमधून आणि बॉलीवूड अभिनेत्यांकडून गोखले यांच्या निधानबाबत उलटसुलट चर्चा झाल्याने काही जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.मात्र ही अफवा असून गोखले हे चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या कुटुंबीयांनीच दिले आहे.