मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खांदापालट करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर पक्ष कारवाया केल्याप्रकरणी नवी मुंबईतील विजय नाहटा, विजय चौगुले या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते आणि संभाजीनगर, जालना जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील मीरा- भाईंदर क्षेत्राच्या प्रभारी संपर्क प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच शिवसेना उपनेते विजय नाहटा तसेच विजय चौगुले यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.दरम्यान,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.उपजिल्हा संघटकपदी अनिता पाटील (कर्जत खालापूर विधानसभा) यांची तर शहर प्रमुखपदी प्रसाद सावंत (माथेरान) यांची नियुक्ती केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले आहे