*वकिलाची सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली – मद्यसम्राट विजय मल्ल्याशी कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे या खटल्यातून आपल्याला वगळण्यात यावे, अशा मागणीची याचिका मल्ल्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर न्यायालयाने या खटल्यातून वकिलाला वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी देऊन त्याची माहिती मल्ल्याला ई-मेल आयडी आणि त्याच्या सध्याच्या पत्त्यावर पाठवण्यास रजिस्ट्रीला सांगितले.
भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून ब्रिटनला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक खटले आहेत. मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये आहे. परंतु त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे हा खटला चालवण्याची आपली इच्छा नाही. त्यामुळे यातून मला माघार घ्यायची आहे. तेव्हा तशी परवानगी मिळावी, अशा मागणीची याचिका मल्ल्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी घेताना न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी वकिलाला खटल्यातून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करावी व त्याची माहिती मल्ल्याला ई-मेल आयडी आणि पत्त्यावर पाठवी, असा आदेश रजिस्ट्रीला दिला. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जुलैमध्ये विजय मल्ल्याला ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. २०१७ मध्येही न्यायालय अवमावन प्रकरणी त्याला दोषी ठरवले होते. त्याची पुनर्विलोकन याचिकाही फेटाळली होती. मार्च २०१६ पासून मल्ल्या ब्रिटनमध्ये राहात आहे. आता त्याच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगून त्याच्या वकिलानेही खटल्यातून माघार घेतली आहे.