पंढरपूर – नांदेडच्या उमरी येथील प्रसिध्द व्यापारी विजय पंढरीनाथ उत्तरवारांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी सुमारे 2 किलो सोन्याचे अत्यंत आकर्षक दोन मुकुट बनवून घेतले आहेत. सुमारे 1 कोटी 3 लाख किंमतीचे हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी उत्तरवार मंदिर समितीकडे सुपूर्द करणार आहेत.
पंढरपुरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल कटकमवारांचे मामा विजय उत्तरवार हे उमरी येथील सोन्याचे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या आई-वडिलांची श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण करण्याची इच्छा होती. ही इच्छा उत्तरवार आणि त्यांच्या मुलांनी पूर्ण करण्याचे ठरवले होते. खामगाव येथून खास कारागीर बोलवून त्यांनी विठुरायासाठी आणि श्री रुक्मिणीमातेसाठी अत्यंत आकर्षक असे दोन मुकुट बनवून घेतले. विठुरायासाठीच्या मुकुटांसाठी 1184 ग्रॅम तर श्री रुक्मिणीमातेच्या मुकुटासाठी सुमारे 784 ग्रॅम, असे दोन्ही मिळून 1968 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी उत्तरवार दांम्पत्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपुर्त करणार आहेत.