सातारा – भारतमाता की जय, वीर जवान तुझे सलाम, अमर रहे अमर रहे वीर जवान सुरज शेळके अमर रहे अशा घाेषणा देत भावपुर्ण वातावरणात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील हुतात्मा सुरज शेळके यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेह लडाख येथे सेवा बजावत असताना शेळके यांना वीर मरण आले होते. वीर जवान सुरज शेळके यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी खटाव येथे आणण्यात आले. खटाव येथे पार्थिव पोहोचल्यानंतर वीर जवान सुरज शेळके यांचे कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतले यानंतर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या वतीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून वीर जवान शेळकेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.वीर जवान सुरज शेळके यांचे वडील प्रताप व बंधू गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी दिला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.