संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

वेळेत काम न करणारे कंत्राटदार काळ्या यादीत! सरकारने आश्वासन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – संभाजीनगरमध्ये राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे कंत्राटदार सक्षम नसल्यामुळे गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याकडे आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर- करोडीपर्यंत असलेल्या ६ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गेल्या ८ वर्षांत तीन वेळा निधी उपलब्ध करूनही रस्त्याचे काम अपूर्ण राहिले. या रस्त्याच्या २८ कोटी रुपयांच्या कामासाठी ७ डिसेंबर २०२२ पर्यंत निविदा मागविण्यात आल्या. चार कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या तरी निविदा उघडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आतापर्यंत या रस्त्याच्या कामासाठी किती वेळा निधी उपलब्ध करून दिला? किती खर्च झाला व अखर्चित किती झाला ? तसेच संबंधित कंत्राटदाराने सक्षम नसल्याचे सांगत काम थांबवले त्यामुळे त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
राजकीय वर्चस्वामुळे याला विलंब होत असल्याचा आरोप दानवे यांनी करत न उघडलेल्या निविदांवर चर्चा करण्यात यावी व चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच संबंधित विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही दानवे यांनी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील राज्य उत्पादन विभागाच्या इमारत व विश्रामगृहासाठी १० कोटींची निविदा मागविण्यात आली असतानाही १० महिन्यांपासून निविदा उघडली नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. काही ठराविक कंत्राटदार क्षमता नसतानाही कंत्राट घेऊन काम पूर्ण करत नाही. त्यांची क्षमता तपासणीसाठी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सर्व निविदांची माहिती दर्शविणारी सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. फेब्रुवारी २०२४च्या आधी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केलं जाईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या