चागुरामास – वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी काल एकाच दिवशी निवृत्तीची घोषणा केली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर लेंडल सिमन्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तर, वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक, फलंदाज आणि माजी कर्णधार दिनेश रामदीन यानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधून खेळताना दिसणार आहे.
लेंडल सिमन्स याने २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजकडून ६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१.५८च्या सरासरीने १९५८ धावा केल्या. ज्यात दोन शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु सिमन्सची कसोटी कारकीर्द फारशी चांगली नव्हती, त्यात ८ सामन्यांत १७.३७च्या सरासरीने तो केवळ २७८ धावा करू शकला. तसेच वेस्ट इंडिजसाठी त्याने ६८ टी-ट्वेन्टी सामने खेळले, ज्यामध्ये २६.७८च्या सरासरीने १५२७ धावा त्याने केल्या. यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने २९ सामन्यांमध्ये ३९.९६च्या सरासरीने १०७९ धावा केल्या. आयपीएल २०१४ मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. तेव्हा त्याने १३ सामन्यांमध्ये ५६.२८च्या सरासरीने ३९४ धावा केल्या होत्या.
तर, दुसरीकडे दिनेश रामदीनने तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. ब्रायन लाराच्या नेतृत्त्वात त्याने २००५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडीजकडून खेळताना ७४ कसोटी, १३९ एकदिवसीय आणि ७१ टी-ट्वेन्टी सामने रामदीनने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या ११० डावांत त्याने २५.००च्या सरासरीने २,२२० धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटी सामन्यांमध्ये यष्टीमागे १०० बळी घेतले आहे.