नवी दिल्ली – महागाईचा आगडोंब उसळला असताना व्यावसायिकांना आज दिलासा मिळाला. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ११५ रुपयांनी कमी केले. त्यामुळे मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १,८४४ ऐवजी १,६९६ रुपयांना मिळणार आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना तूर्त कोणताच दिलासा मिळालेला नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आज सुधारित इंधन दर जाहीर केले. त्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली. वेगवेगळ्या शहरात ही वेगवेगळी दर कपात आहे. मुंबई आणि दिल्लीत ११५ रुपये ५० पैशांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत इंडेनचा १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर १,७४४ रुपये झाला. मुंबईत हा गॅस सिलिंडर १,६९६ रुपये झाला आहे. कोलकत्यात या सिलेंडरच्या दरात ११३ रुपयांची कपात झाली. त्यामुळे तो १,८४६ रुपये झाला. चेन्नईत हा गॅस सिलिंडर ११६ रुपये ५० पैसे स्वस्त झाला आहे. तेथे तो १,८९३ रुपये झाला आहे. यामुळे हॉटेल चालक आणि व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.