शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना जन्मठेप! फाशी रद्द

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – साल २०१३ मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवूरन टाकणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज आपला अंतिम निर्णय सुनावला. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तीन दोषींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली आहे.

ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात महिला फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात २०१४ मध्ये तीन आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र दोषींनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ३ जून २०१९ रोजी उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले होते. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठाने सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल आज, गुरुवारी जाहीर केला. राज्य सरकारने या खटल्यासाठी ऍड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाचे वाचन केले. त्यांनी विजय जाधव, मोहम्मद कासिम बंगाली आणि मोहम्मद सलीम अन्सारी या दोषींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. ‘फाशीच्या शिक्षेने पश्चात्तापाची संकल्पना संपुष्टात येते. या प्रकरणात दोषी हे फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत, असे म्हणता येणार नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल आयुष्यभर पश्चात्ताप करण्यासाठी ते पात्र आहेत. त्यांच्याबाबतीत सुधारणेविषयी कोणताही वाव नाही आणि समाजात पुन्हा मिसळण्यासाठीही ते पात्र नाहीत’, असे न्यायालयाने म्हटले.

२०१३ या वर्षातील २२ ऑगस्ट या दिवसाने संपूर्ण देशाला सुन्न केले. या तारखेला सायंकाळी सहा वाजता एक २२ वर्षीय महिला फोटो जर्नलिस्ट आपल्या पुरुष सहकाऱ्यासोबत महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. अगदी सुनसान बंद असलेल्या याठिकाणी काही लोकांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगत आमच्या परवानगीशिवाय फोटो काढू शकत नाही, असे म्हटले. नंतर त्यांनी महिला पत्रकार आणि तिच्या सहकाऱ्याला आत नेले. आत गेल्यावर दोघांवर हल्ला केला आणि सहकाऱ्याला बांधून ठेवले. तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच पाच नराधमांनी महिला पत्रकारावर अमानवी अत्याचार केले. तब्बल दोन तास झटल्यानंतर दोघांनी कशीबशी आपली सुटका करून थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले आणि पोलिसही या घटनेने हादरून गेले. पुढील ७२ तासांत पोलिसांनी विजय जाधव, मोहम्मद कासिम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, आकाश जाधव (अल्पवयीन आरोपी) आणि सिराज रहमान खान या पाचही नराधमांना अटक केली. संतापजनक म्हणजे या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणखी एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले. आरोपींच्या अटकेनंतर काही दिवसांनी एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर पुढे आली. ३१ जुलै २०१३ रोजी शक्ती मिल परिसरातच आपल्यावरही सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर दोन्ही प्रकरणात एकूण सात जणांना अटक झाली. यात दोन अल्पवयीन आरोपी होते, तर यापैकी तीन आरोपींचा दोन्ही प्रकरणांत समावेश होता.

आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, ते अशाप्रकारच्या शिकार आपली वासना मिटवण्यासाठी शोधत होते. मदनपुरा, भायखळा आणि आगरीपाडा परिसरात ते नेहमी पॉर्न फिल्म बघायचे. तसेच रेड लाईट परिसरातही त्यांचे येणे जाणे असायचे. बलात्कार केल्यानंतर त्यांनी पावभाजी खाल्ली. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात ऑक्टोबर २०१३ मध्ये आरोपींवर ३६२ पानांची चार्जशीट दाखल केली. दोन्ही प्रकरणात पीडितांकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यानंतर आरोपींना दोषी मानले गेले. दोन्ही प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये सत्र न्यायालयाने निर्णय सुनावला. विजय जाधव, मोहम्मद कासिम बंगाली आणि मोहम्मद सलीम अन्सारी हे तिघे दोन्ही प्रकरणात दोषी सिद्ध झाले. या तिघांना दोन वेळा सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर आकाश जाधव या अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आणि सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला फाशीची शिक्षा झालेल्या दोषींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी आज अंतिम निर्णय सुनावताना ‘भारतीय दंड संहितेतील ३७६-ई या कलमान्वये बलात्काराच्या गुन्ह्याच्या प्रकरणात आधी दोषी ठरलेल्याने पुन्हा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला फाशीची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याअनुषंगाने दोषींना नैसर्गिकपणे मरण येईपर्यंत जन्मठेप सुनावण्यात येत आहे’, असे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आज स्पष्ट केले.

Close Bitnami banner
Bitnami