मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना न्युमोनिया झाला आहे. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. मात्र अजून दोन दिवस त्यांना रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पवारच्या तब्येतीची माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आणखी एक ते दोन दिवस बरे होण्यासाठी लागतील.त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिराला ते हजार राहण्याची शक्यता धूसर आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आज शरद पवार यांच्या तब्येतीबाबत बोलताना म्हणाले की, शरद पवार यांना न्युमोनिया झाला आहे. दिवाळीच्या काळात ते हजारो कार्यकर्त्यांना भेटले. त्यानंतर त्यांना संसर्ग झाला आहे. आज ते फ्रेश दिसत होते. मोठ्या मोठ्या आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यामुळे ते लवकर बरे होऊन शिबिराला उपस्थित राहतील अशी मला खात्री वाटते. राष्ट्रवादीच्या शिबिरात उद्या शरद पवार मार्गदर्शन करणार होते. परवा जर पवारांना डिस्चार्ज मिळाला तर तरे शिबिराला उपस्थित राहू शकतील असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.