सांगोला- शिंदे गटात सामील होत गुवाहाटीला गेलेले आणि काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समद कस ओके हाय, या वक्तव्यामुळे फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल आता मनसेकडूनच करण्यात आली आहे.शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील सध्या जवळीक होत असतानाही मनसेने शहाजी बापू पाटील यांची पोलखोल केली आहे.
‘समद ओके’ हाय’ म्हणणारे आणि आपण केलेली बंडखोरीही ओकेच असल्याचे वारंवार सांगणारे शहाजी बापू पाटील यांची सांगोला तालुक्यात काय ते रस्ते, काय ते खड्डे आणि काय तो भ्रष्टाचार,शहाजीबापू नॉट ओके असेच म्हणण्याची वेळ आली असून शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या बोगस कामांची पोलखोलच आता मसनेकडून करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी उद्घाटन केलेले ररस्ते किती ओके आहेत याचा एक व्हिडियोच आता व्हायरल करण्यात आला असून, शाहजी बापू पाटील यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल मनसेकडून करण्यात आली आहे.आमदार शहाजी बापू पाटील यांच्या फंडातून रस्त्यांची कामे झाली परंतु निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने त्यांच्यावर मनसेने आरोप केला आहे.
आमदार शाहजी बापू पाटील यांनी ३१ऑगस्टला मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेल्या सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३८६ या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मनसे तालुकाध्यक्ष अक्षय विभुते यांनी केली आहे. दरम्यान याबाबत विभुते यांनी याचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान पुढच्या १५ दिवसांमध्ये चौकशी करावी व दोषी कॉन्ट्रॅक्टरची लायसन्स जप्त करावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.