शहापूर – शहापूरच्या तरुण शेतकऱ्याने बिबट्याशी झुंज देऊन त्याला जंगलात पिटाळले व स्वतःचा जीव वाचवला. ही थरारक घटना विहीगाव येथील राड्याचा पाडा या कसारा वन परिक्षेत्रात घडली. मंगेश मोरे असे या जिगरबाज शेतकऱ्याचे नाव आहे. यात तो जखमी झाला आहे.
शहापूर तालुक्यातील विहीगावच्या कसारा वनक्षेत्रातील राड्याचा पाडा येथे मंगेश मोरे राहतो. सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास तो शेतात वरई कापणीसाठी जात होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. तेव्हा त्याने न घाबरता हातातील काठीने बिबट्याचा सामना केला. त्यामुळे नरभक्षक बिबट्या जंगलात पळून गेला. या घटनेत मंगेश जखमी झाला. बिबट्यासोबत दोनहात केल्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनच दिवसांपूर्वी वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील कोठारे गावातील वासराचा बिबट्याने फडशा पडला होता. डोळखांब येथील रानविहारच्या जंगलात किसन खाकर या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवला होता. मात्र ते यातून थोडक्यात बचावले होते. या प्रकारांमुळे परिसरातील आदिवासी शेतकरी धास्तावले आहेत.