शहापूर- प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे शहापूर नगर पंचायतीतील कंत्राटी सफाई कामगारांना डिसेंरपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहापूर नगर पंचायतीने कचरा उचलणे साफ सफाई करणे आणि आदीं कामे ठेकेदारामार्फत केली जातात. श्री स्वामी सर्व्हिसेस या ठेकेदाराला टेंडर मंजूर असून त्या कराराची मुदत देखील संपली आहे. ती वेळेत नूतनीकरण करणे आवश्यक होती.
एकंदरीत नगर पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे ती लांबणीवर पडली. ठेकेदाराने आपले बिल सादर केले असून शहापूर नगर पंचायत कार्यालयामार्फत प्रशासकीय मंजुरीकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिन्यांपासून तसेच पडून आहे. त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे ठेकेदाराचे बिल मंजूर होण्यास विलं होतो. बिल मंजूर होत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांना पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना ठेकेदाराने कंत्राटी कामगारांना टांगणीला ठेवले आहे. डिसेंबर महिन्या पासून पगार न मिळाल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. नगर पंचायतीचा निधी असता तर कंत्राटी कामगारांना वेतन देण्याची व्यवस्था करता आली असती. चौदाव्या वित्त आयोगाच्या तरतुदी नुसार निधी असल्यामुळे त्यास जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय मंजुरीची आवशक्यता आहे. शहापुर नगर पंचायती कडून पाठ पुरावा सुरू असून लवकरच कंत्राटी कामगारांना वेतन मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे, असे शहापूर नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.