मुंबई- अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे बँडस्टँड येथील मन्नत या बंगल्यामध्ये दोन तरुण अवैध पद्धतीने घुसले होते. हे प्रकरण झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला त्याच्या मन्नत या बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या सुचनेनंतर शाहरुख आपल्या बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची शक्यता आहे.
दोन्ही आरोपी शाहरुख खानला भेटण्यासाठी मन्नत या बंगल्यात गुपचूप घुसले आणि सुमारे आठ तास शाहरुख खानची मेकअप रूममध्ये वाट पाहत बसले होते. मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. घरात अनोळखी व्यक्ती पाहून शाहरुख खानला धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केले असता 10 हजार रुपयांवर जामीन मिळाला. त्यानंतर आता पोलिस अधिकारी म्हणाले की, शाहरुखच्या बंगल्यामध्ये दोन चाहत्यांनी घुसखोरी केल्याची घटना घडल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाचे सिक्युरिटी ऑडिट करण्यास सांगितले. बंगल्यामधील कोणत्या गोष्टी हरवल्या आहेत का? याची तपासणी देखील या ऑडिटमध्ये होईल. सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी हे ऑडिट करण्यास सांगितले आहे.