मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने काल गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी फुंकर मारण्याची केलेली कृती चांगलीच गाजत आहे. अनेकांनी शाहरुख खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांची हजेरी शिवाजी पार्कवर पाहायला मिळाली. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरीसह लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आला होता. तेव्हा त्याने दोन्ही हात पसरून आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुवा मागितली. यानंतर मास्क खाली करून त्याने फुंकर मारल्यासारखी कृती केली. मग दोन्ही हात जोडून पार्थिवाला प्रदक्षिणा घातली. या संपूर्ण प्रकारावरून सोशल मीडियात एका नवा वाद चर्चिला जात आहे. शाहरुख खानने दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करून केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी ट्वीट करत केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अनेकांनी ट्वीटरवर पोस्ट करत शाहरुख खानने मास्क खाली करून लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी तो थुंकला असा दावा केला आहे. काहींच्या मते शाहरुख खानने असे करून लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे काही करण्यापूर्वी त्याने विचार करायला पाहिजे होता, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. पण खरेच शाहरुख खानने असे केले का? तो खरंच थु्ंकलाय का? याबाबत काहींनी शाहरुख खान हा थुंकलेला नाही. थुंकणे आणि फुंकणे यात जमीन आस्मानचा फरक असतो, हे वेगळे सांगायला नकोच पण दोन्ही गोष्टी करताना आपल्या ओठांची होत असलेली रचना सारखी असल्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला पण ही गोष्ट अनेकांनी समजून घेण्याच्या आधीच विखारी टीका शाहरुख खानवर करण्यास सुरुवात केली असे म्हटले आहे.