मुंबई – गेल्यावर्षी २२ डिसेंबर रोजी राज्य सरकारने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन निर्णय जारी करता आला नव्हता.अखेर यासंदर्भातील शासन निर्णय काल सोमवारी काढण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाणार आहे.
२२ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना १६ हजार रूपये, माध्यमिक वर्गात १८ हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल.तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना १४ हजार रूपये,पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार रूपये,कनिष्ठ लिपिकास १० हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी (केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती) यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.