पुणे – शिरुरमध्ये मायलेकीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जावयानेच हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. न्यायालय परिसरात ही घटना घडली असून यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे कळते. कौटुंबिक वादाप्रकरणी आज न्यायालयात या कुटुंबाची तारीख होती, त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, जावयाने झाडलेली गोळी त्याच्या पत्नीला लागली असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीररित्या जखमी असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मात्र घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.