शिर्डी – कोरोनाच्या निर्बंधांनंतर दर्शनासाठी खुल्या झालेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ७ महिन्यांत ६४ लाख भाविकांनी दर्शन घेतले. या काळात संस्थानाच्या झोळीत १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले, अशी माहिती शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. शिर्डीतील भाविकांच्या संख्येत आणि दानाच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिर्डीतील साईबाबा मंदिर २ वर्षे बंद होते. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ते भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. तेव्हापासून ३१ मे २०२२ या ७ महिन्यांच्या काळात साई मंदिराच्या दानपेटीत १८८ कोटी ५५ लाखांपेक्षा अधिक दान जमा झाले. या ७ महिन्यांच्या काळात ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. मे महिन्याची सुट्टी आणि सलग जोडून येणाऱ्या सुट्ट्या यामुळे दररोज २ ते ३ लाख भाविक साईबाबा समाधीचे दर्शन घेतात. भाविकांचा आणि दानाचा आकडा रोजच वाढत आहे. बाबांच्या दरबारात येणारे भाविक एक रुपयापासून लाखो रुपयांपर्यंत दान करतात. सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचेही दान करतात. काहीजण काही कोटी रुपयांचे दान देतात. यामुळे कोरोनानंतर अवघ्या ७ महिन्यांत साईबाबांच्या झोळीत १८८ कोटी 55 लाखांपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. भाविकांची संख्या जशी वाढत आहे, तसा दानाचा आकडाही वाढत आहे. दिवसाकाठी हजारो रुपयांत जमा होणारे दान आता कोटींच्या घरात गेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.