शिर्डी -राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पूरपरिस्थिती बनली आहे.मात्र,अशातही नागरिक जीवघेणा प्रवास करत आहेत.शिर्डीमध्येही जलमय झालेल्या रस्त्यावरुन जाण्याचे धाडस केल्याने कर्नाटक-शिर्डी बस एका पूराच्या पाण्यात अडकली.
कर्नाटक परिवहन मंडळाची बस रस्त्यातच अडकली होती.नाशिकच्या शिर्डीमध्ये जोरदार पावसाने शिर्डीनजीक असलेला नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला होता, त्यामुळे या रस्त्यात शेकडो वाहने अडकली होती.रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली,यामुळे महामार्गा शेजारील ओढ्याला पूर आला होता. अशात एका बस चालकाने प्रवाशांनी भरलेली बस पाण्यातून नेण्याचे धाडस केले आणि ते त्याच्या अंगलट आले.ही बस एक तास पूराच्या पाण्यात अडकली होती,ज्यात प्रवासीही होते.यामुळे बसचालकाची चांगलीच फजिती झाली होती.बस पाण्यात अडकल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढली.नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला तरीही अनेक वाहनधारक या रस्त्यावरुन जीवघेणा प्रवास करत आहेत.याकडे स्थानिक प्रशासनाकडून मात्र अद्यापही उपाययोजना केल्या नसल्याने काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.