कराड – शिवसेनेचे माजी कराड तालुका प्रमुख आणि श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके (५२) यांचा कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ते महामार्गावर उभे राहिले असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेने घोगाव, उंडाळे परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
घोगाव येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेसमोर कराड-रत्नागिरी महामार्गावर अशोकराव भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. या हॉटेलसमोर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावर उभे होते. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते महामार्गावर डांबरी रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना निदर्शनास येताच हॉटेलमधील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी मलकापूर- कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही दुःखद बातमी समजताच अनेक शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी अनेक शिवसैनिकांना शोक अनावर झाला होता. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात १९९५ मध्ये पहिल्यांदाच भावके यांनी काँग्रेसच्या स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढत दिली होती. त्यावेळी त्यांनी कराड दक्षिणमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण करत भगवा झळकवला. परंतु, त्यांना यश आले नाही. मात्र, या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली. अल्पावधीतच घोगाव येथे त्यांच्या जन्मगावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना केली.