मुंबई – शिवसेनेच्यादृष्टीने अस्तित्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा असलेल्या मुंबई महानगपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे यावेळी शिवसेनेसमोरील आव्हान कडवे असणार आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या प्रचारातील घोषणा हा कायमच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला आहे. पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत सामान्य मुंबईकरांना साद घालता येईल आणि त्यांच्या भावेल असं घोषवाक्य किंवा टॅगलाईन तयार करण्यावर शिवसेनेचा भर असतो. येणाऱ्या निवडणुकीत ‘पुढे चला मुंबई’ म्हणत शिवसेना मतदारांना साद घालणार आहे.
२०१७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे ‘करुन दाखवलं’ हे घोषवाक्य चांगलेच लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची टॅगलाईन काय असणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘पुढे चला मुंबई’ ही यंदाच्या निवडणुकीतील शिवसेनेची टॅगलाईन असू शकते. याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून पालिका निवडणुकीची जबाबदारी असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडून त्यांच्या अनेक ट्विटसमध्ये #पुढेचलामुंबई असा हॅशटॅग वापरला जात आहे. त्यामुळे हेच शिवसेनेचं घोषवाक्य असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.