मुंबई – दादर येथील शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि स्थानिकांनी केला आहे. यामुळे मनसे आणि शिवसेना यांच्या शीतयुद्ध रंगलं आहे. शिवाजी पार्क मैदानात महापालिकेने खडी टाकल्याने मनसे कार्यकर्त्यांनी माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत तिथे धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. प्रत्यक्षात या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पण मनसेनं त्याला आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवाजी पार्क परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानात सुशोभिकरणाचं काम सुरु आहे. हे काम सुरू असतानाच शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खडी टाकून रस्ता बनवण्यात आला आहे. याला मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. सुशोभिकरणाला विरोध नसून मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर हे काम करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास हे काम थांबवण्यात आले आहे.