मुंबई – ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे ही आमची इच्छा नाही, असे स्पष्ट मत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असे आवाहनही केले.
पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यावेळी म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदीचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे ही आमची इच्छा नाही. आमचं म्हणणे आहे की शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून राजकारणी लोकांचा जो वाद चालला आहे तो त्यांनी कृपया बंद करावा. दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये, असे ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले.
राज्य सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ती विनंती स्वत: लता मंगेशकर यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती आनंदाने मान्य केली होती. त्याची पूर्वतयारी त्यांनी केली आहे. संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा अन्य मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून निरर्थक वाद सुरू आह़े. हा वाद, राजकारण थांबवा़, लता मंगेशकर संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आह़े. या संगीत स्मारकापेक्षा अन्य मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही पं. हृदयनाथ मंगेशकर यावेळी म्हणाले.